ब्युरो टीम : राज्याच्या अनेक भागांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले आहे. तर काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर संघर्ष वाढण्याचीच ही पूर्वलक्षणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरात कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक पार पडली.
मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदावर व महत्त्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवऊन आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना दिल्या आहे. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे. विशेष शाखेने सोशल मिडीयावर लक्ष ठेवून संबधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले आहे. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेवून योग्य कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांच्या परित्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा