करोना पुन्हा येतोय? केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना




ब्युरो टीम :  देशात कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे या आजारावर मिळवलेले नियंत्रण कमी होता कामा नये, यासाठी सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. करोनाप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये अजिबात हयगय करू नये. संसर्ग पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी रुग्णवाढीच्या ठिकाणी चाचण्या, देखरेख, उपचार, लसीकरण आणि करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन या पंचसूत्रीचा वापर करा, अशी सूचना केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.
करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी खबरदारीची सूचना केली आहे. करोनासंसर्ग आटोक्यात आला असतानाच मागील दोन आठवड्यांपासून रुग्णंसख्या पुन्हा वाढताना दिसत आहेत. १ जूनच्या दोन हजार ६६३ रुग्णांच्या तुलनेत ८ जूनला चार हजार २०७ दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. याशिवाय आठवड्याचे पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही ०.६३ टक्क्यांवरून (१ जून) १.१२ टक्क्यांपर्यंत (८ जून) वाढले आहे. मागील २४ तासांत सात हजार २४० नव्या बाधितांची नोंद झाली असून, यातील ८१ रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि कर्नाटकमधील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी चाचण्या वाढवण्यावर भर देण्याची सूचना भूषण यांनी पत्रात केली आहे. करोनाप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये अजिबात हयगय करू नये व संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रगतीच्या दिशेने काम करत राहावे, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने