ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन आणि स्थान किती मोठे आहे, याचा प्रत्यय गेल्या काही तासांमध्ये येत आहे. एकनाथ शिंदे यांनी काल, सूरतमधील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकत शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकवले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल १३ आमदार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता २४ तास उलटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटातील आमदारांचा आकडा जवळपास ४० च्या पुढे जाऊन पोहोचत आहे.
एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ४० आमदार होते. त्याचवेळी शिंदे यांनी, आज दुपारपर्यंत शिवसेनेचे आणखी १० आमदार मला येऊन मिळतील, असा दावा केला होता. हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी सकाळी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे महाराष्ट्रात असलेले आमदार टप्प्याटप्प्याने गुवाहाटीकडे रवाना होताना दिसत आहेत. अगदी काल संध्याकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थित असणारे शिवसेनेचे जळगावातील आमदार गुलाबराव पाटील हेदेखील काहीवेळापूर्वीच गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. याशिवाय कोकणातील आमदार योगेश कदम आणि संजय राठोड हेदेखील आज सकाळी गुवाहाटीला गेले. याशिवाय, नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यादेखील एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळतील, अशी शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा