ब्युरो टीम : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले. आता आम्ही वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी जात आहोत. काही गोष्टी निश्चितच संशयास्पद आहेत. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, महाराष्ट्रात हा पॅटर्न चालणार नाही. तुम्हाला या पद्धतीने किंगमेकर होता येणार नाही, या पद्धतीने सरकार अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
‘शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण झाले त्यांची अवस्था तुम्ही पाहातच असाल, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचे सांगितले. पण शिंदे यांच्या भूमिकेविषयी राऊत यांनी मौन बाळगले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांना दिशाभूल करून त्याठिकाणी नेण्यात आल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. शिवसेनेत भूकंप होणार, असे जे काही चित्र रंगवले जात आहे, त्यामध्ये तथ्य नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. तसेच शिंदेसोबत गेले म्हणून सांगण्यात येत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश असल्याचे राऊत यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा