'शिंदेसाहेब विजयी भव...' तृप्ती देसाई यांची पोस्ट चर्चेत

ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला अनेकजण समर्थन देत असून त्यांचे कौतुकही करीत आहे. भूमिका ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही फेसबुकवर पोस्ट करून 'शिंदेसाहेब विजयी भव' असे म्हटले आहे. तसेच आपल्या इथे लोकशाही आहे, ठोकशाही नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. 
शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा दिवस होऊन गेले आहेत. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्या. शिंदे यांचा बंड लवकरच थंड होईल, असेही तर्क लावले जात होते. शिंदेसोबत असणारे आमदार त्यांची साथ सोडतील, असेही महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. दुसरीकडे मात्र शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशांनुसार उद्या अर्थात ३० जून रोजी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानभवनात हजर राहावं लागणार  आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारही उद्या मतदानासाठी मुंबईत येत आहेत. दुसरीकडे यासर्व पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. यासर्व प्रकारावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहे. 
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही फेसबुकवर पोस्ट करीत यासर्व प्रकारावर आपले मत मांडतानाच शिंदे यांना एकप्रकारे पाठिंबा दिला आहे. देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या इथे लोकशाही आहे, ठोकशाही नाही. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचाच विजय होणार, शिंदेसाहेब “विजयी भव”.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने