पुणे : ‘संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत,’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे बोलताना केले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या भाषणात मोदी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या विविध अभंगांचे दाखले दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी देखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळ देखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवास देखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वत: देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावनेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो,’ असे सांगतानाच पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय राजमार्गांच्या चौपदरी करण्याच्या कामाचे उद्घटान करण्याची संधी मिळाली होती. श्री संत ज्ञानेश्वर महारज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्यांमध्ये होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये ३५० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बनतील आणि यावर ११ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपये खर्च केले जातील.या प्रयत्नांनी क्षेत्राच्या विकासाला देखील गती मिळेल.’
टिप्पणी पोस्ट करा