ब्युरो टीम : ‘मी मुख्यमंत्रिपदाला लायक नसेल तर सांगा, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझं काय चुकलं हे सांगा, मी आता राजीनामा द्यायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हटलं. त्यांचं भावनिक भाषण होऊन १८ तास उलटल्यानंतर शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी या पत्रातून उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं, त्यांनी अडीच वर्षाच्या काळात कोणत्या चुका केल्या, याचा पाढाच पत्रातून वाचला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हे पत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अॅक्शनला शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांची रिअॅक्शन मानली जातीये.
शिवसेनेचे जवळपास ३५ ते ४० आमदार फुटल्यानंतर आणि भावनिक आवाहन करुनही एकनाथ शिंदे मानायला तयार नाहीयेत, हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे येत काल महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले होते की, मी मुख्यमंत्रिपदाला लायक नसेल तर सांगा, ‘शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझं काय चुकलं हे सांगा, मी आता राजीनामा द्यायला तयार आहे.’ त्यातच आता आमदार संजय शिरसाट यांनी पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून आपण आम्हाला भेटत नव्हता, आपण आम्हाला वेळ देत नव्हतात, ही सगळ्यात मोठी खंत या पत्राच्या माध्यमातून संजय शिरसाट यांनी मांडली आहे. दुसरी मोठी खंत आहे ती म्हणजे निधीची... काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधी मिळत होता, त्यांच्या उद्घाटनांचे समारंभ सुरु होते, त्याचे फोटो आम्ही सोशल मीडियावर पाहायचो. पण आमचा मुख्यमंत्री असूनही आम्हा भेट मिळत नव्हती आणि निधीही मिळत नव्हता, असं संजय शिरसाठ यांनी पत्रात म्हटलंय. तिसरा प्रमुख मुद्दा म्हणजे-मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, अशी टीका कालपर्यंत भाजप नेते करायचे. आज मात्र शिवसेनेच्या आमदाराने भाजप नेत्यांपेक्षाही अंगावर जाणारी टीका केली आहे. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळयाचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केलाय.
टिप्पणी पोस्ट करा