ब्युरो टीम : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणारे आमदार नितीन देशमुख हे काल गुवाहाटी वरुन परत आले. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले. त्यानंतर ते अकोल्यासाठी रवाना झाले. मी स्वतः आपली सुटका करून आलो, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होत. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे.
आमदार नितीन देशमुख खोटं बोलत आहेत, हे सिद्ध करणारी छायाचित्र आणि व्हिडिओ एकनाथ शिंदे गटाने पुढे आणले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ बघता, आमदार देशमुखांवर कुठलीही बळजबरी केली गेली होती, असे वाटत नाही. पण मग ते खोटं कशासाठी बोलले? हा संभ्रम पसरवण्यामागे त्यांचा उद्देश काय? जर त्यांना चार्टर्ड प्लेनने सन्मानाने पाठवण्यात आले, तर मग ते स्वमर्जीने आले की, एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून ते परत आले, आदी प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.
दरम्यान, नितीन देशमुख यांचा दावा खोटा आहे, हे दाखवणारी काही छायाचित्र आणि व्हिडिओ शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आली आहेत. आमदार देशमुख यांचा गुवाहाटी ते नागपूर हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना येथपर्यंत पोहोचवले. येथे अकोल्याचे शिवसेनाजिल्हाप्रमुख गोपाल दातकर त्यांना घ्यायला आले होते. येथून त्यांच्यासोबत कारने ते अकोल्याला गेले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अकोल्यात पोहोचल्यावरही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी जे दावे केले, ते धादांत खोटे आहे, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा