विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसने ‘भाई’ सोबत कोणाला दिली उमेदवारी ?

मुंबई : भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांच्या सहीने हंडोरे आणि भाई जगताप यांच्या उमेदवारीचं नावाचं पत्रक काढलं गेलं आहे.
राज्यसभेवरुन रंगलेले राजकारण संपत नाही, तोच विधान परिषदेची निवडणूक येत्या २० तारखेला होत आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अनेक दिग्गज नेते विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. दरम्यान, भाजप शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मुंबईतील 'वेस्टीन हॉटेल' इथे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ सदस्य निवडणूक जाऊ शकतात. मात्र आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस होऊ शकते.
दरम्यान, भाजपकडून बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने