ब्युरो टीम : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदान केलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या अन्य काही आमदारांनीही मतदान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा निवडून आल्या होत्या. मात्र पंढरपूरमधील आमदारांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीचं संख्याबळ ५३ इतकं असून यापैकी अनिल देशमुख व नवाब मलिक हे ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. तसंच त्यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने त्यांची मते सोडून राष्ट्रवादीची संख्या ५१ होते. राष्ट्रवादीला इतर सहा आमदारांचा पाठिंबा असून त्यात देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे, केशव जोरगेवार, शामसुंदर शिंदे, रईस शेख, अबू आझमी यांचा समावेश आहे. तसंच माकपने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला असल्यामुळे महाविकास आघाडीकडे विनोद भिवा निकोले यांचेही मत आहे. राष्ट्रवादीचे आमदार मतदान करून परतल्यानंतर शिवसेना आमदारांची बस विधानभवनाकडे रवाना होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेस व भाजपचे आमदार मतदानासाठी विधानभवनाकडे जाऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा