ब्युरो टीम : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आल्यानंतर विमानतळापासून विधानमंडळात पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. गोव्यातून आमदार मुंबईत येणार आहेत. यापूर्वी केंद्र सरकारनं १५ आमदारांना वाय सुरक्षा दिली होती. आता उद्याच्या बहुमत चाचणीसाठी आमदारांना सुरक्षितपणे विधानमंडळात पोहोचवण्यासाठी दिल्ली आणि उत्तर भारतातील सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांनी जवान मुंबईत पोहोचले आहेत.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्ले होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सतर्कता घेण्यात आली आहे. आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचतील यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. उद्याच्या बहुमत चाचणीच्या निमित्तानं मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. कोणीही प्रक्षोभक वक्तव्य करु नये, बॅनर लावू नये यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा