ब्युरो टीम : वाराणसीच्या दौऱ्यावर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परत येताना गंगाजल आणले आहे. आता या गंगाजलाचे छोटे छोटे कलश तयार करून ते राज्यभर पाठविण्यात आले आहेत. राज्यातील विविध तीर्थस्थळी या गंगाजलाचा अभिषेक करण्यात येणार असून बुधवारी याची सुरुवात मतदारसंघातील कर्जत येथून झाली. त्यानंतर गंगाजल घेऊन निघालेले वाहन राज्याच्या दौऱ्यावर रवाना करण्यात आले.
आमदार रोहित पवार नुकतेच देशाच्या विविध भागांत धार्मिक स्थळांची यात्रा करण्यासाठी गेले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वाराणशीच्या विश्वेश्वराची पूजा, अभिषेक व गंगाआरती त्यांनी केली होती. तेथून त्यांनी गंगाजल आणले आहे. आता आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्राच्या विविध भागातील धार्मिक व आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी या गंगाजलाने अभिषेक करण्याची कल्पना त्यांना सूचली. त्यांनी तात्काळ ही कल्पना कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार गंगाजलाचे शेकडो कलश तयार करून राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक तीर्थस्थळी पाठवण्यात येत आहेत. राज्याच्या व देशाच्या कल्याणासाठी स्थानिक प्रथेनुसार पूजा - अभिषेक करून संबंधित देवस्थानच्या पुजारी, विश्वस्त यांनी प्रार्थना करावी, अशी विनंती आमदार पवार यांनी पत्र लिहून सर्वांना केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा