ब्युरो टीम : ‘आमची परिस्थिती नसतानाही आम्ही त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी भरपूर केलं. हे जे मिळालं आहे निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मिळालंय. पण आमचाही त्यात त्याग आहे. आम्ही आमच्या घरी तुळशी पत्र ठेवून काम केलेलं आहे. आम्ही आयत्या बिळावर नागोबावाले नाही. संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू. चुना कसा लावतात हे त्यांना माहित नाही अजून, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना चुना लावेल,’ असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे वेध लागले आहेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला पोहोचतील. त्यापूर्वी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ‘आदमी तूट जाता हैं घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढाने में, उम्र बीत जाती हैं दोस्ती निभाने में..., अशी शायरीही त्यांनी ऐकवली.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडाळी केली. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. आमदारांनी बंड पुकारल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात ताशेरे ओढले. कधी त्यांचे १०० बाप असं म्हटलं, तर कधी त्यांची प्रेतं मुंबईत येतील अशी जिव्हारी लागणारी टीका केली. त्याला आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव यांनी तशाच शब्दात उत्तर दिलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा