भाजपचे हे ‘चाणक्य’ 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये



ब्युरो टीम : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. काल विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक झाली. भाजपचे सर्वच्या सर्व ५ उमेदवार विजयी झाले. यानंतर शिवसेनेचे २० पेक्षा अधिक आमदार गायब असल्याने पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना आमदार नाराज असल्याने त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होणार असून सरकारच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्व आमदारांची भेट घेतील, अशी माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले इतर शिवसेना आमदार सध्या सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. हे आमदार पुढील काही तासांत अहमदाबाद शहरात जातील आणि तिथे त्यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होईल, असे समजते.

दरम्यान, शिवसेनेत आतापर्यंत ठाकरे कुटुंबाचा शब्द अंतिम मानला जात असे. मात्र एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची मोट बांधत पक्षनेतृत्वाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे नेमकी काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने