ब्युरो टीम : ‘माझ्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही, या पद्धतीच्या संकटाचा सामन करण्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही बाळासाहेबांसोबत वर्षानुवर्ष काम केलं आहे. फक्त बाळासाहेबांचे भक्त आहे, असं म्हटल्याने काही होत नाही,’ अशी खोचक टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘ईडीच्या भीतीने पक्ष सोडून गेलेले दोन-चार लोक म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आमदाराला थांबण्याचे आवाहन केलेले नाही. पण मी एवढंच सांगतो की, या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच. जो कुठल्या तणावाखाली येऊन पक्ष सोडतो तो बाळासाहेबांचा भक्त नसू शकतो, आम्ही आहोत, आमच्यावरही मोठा दबाव, गेल्या ४ दिवसांपासून एक मंत्री सतत ईडीच्या कार्यालयात जात आहे, त्याने पक्ष नाही सोडला, मी आणि माझ्या कुटुंबावर ईडीचा दबाव, आम्ही आजही ठाकरे कुटुंब आणि पक्षासोबत राहू, अखेरच्या श्वासापर्यंत राहू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली पक्ष मजबूत आहे. चार आमदार, २ खासदार, २ नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत, हे का सोडून गेलेत याची कारण लवकर समोर येतील, त्यांच्याशी चर्चा सुरु, जबरदस्तीने त्यांना तिथे नेल्याच्या तक्रारी येत आहेत. आज नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची पत्रकार परिषद ते तुम्हाला सर्व सांगतील. अशा प्रकारे किमान १७ ते १८ आमदार हे भाजपच्या कब्जात आहेत. मी भाजप हाच शब्द वापरतो, कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजप शासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा