ब्युरो टीम : ‘आपण दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. त्याच बरोबर सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही, असे शिवसेना नेता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण त्याच बरोबर शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.
गेल्या २४ तासाहून अधिक काळा महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे. नाराज आमदारांसह भाजपचा गड असलेल्या आसाममध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून करण्यात आलेली कालची गटनेतेपदाची निवड ही अवैध पद्धतीने झाली आहे. सर्व आमदारांना बोलवून बहुमताने गटनेता निवडला जातो. पण बहुमताचा आकडा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे काल निवडण्यात आलेला गटनेता हा कायदेशीरी नाही, असे सांगतानाच शिंदे यांनी पुढे सांगितले, मी कोणाच्या विरोधात बोललो नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट केली नाही जी चुकीची आहे. तरी देखील मला गटनेतेपदावरून हटवले, माझे पुतळे जाळले, माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत आणि मला बदनाम केले जात आहे, हे योग्य नाही. गटनेतेपदासोबत शिंदे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे उत्तर दिले आहे. सर्व आमदार माझ्यासोबत स्वखुशीने आहेत. आमदारांची नाराजी याआधी देखील मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राऊतांनी असा आरोप केला होता की शिवसेनेच्या आमदारांना मारहाण करण्यात आली आणि त्याचे अपहरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा