देवीच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होणार : एकनाथ शिंदे



ब्युरो टीम : ‘कामाख्या देवीच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होणार आहे. उद्या बहुमत चाचणीसाठी आम्ही मुंबईत जातोय,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 
 उद्या ठाकरे सरकारच्या 'बहुमताची परीक्षा' होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यानंतर गुवाहाटीमध्ये असलेल्या शिंदे गटामध्ये उत्साहाचं वातावरण संचारलं आहे. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्याअगोदर एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. हॉटेलपासून मंदिरापर्यंत जात असताना आमदारांना सुरक्षा व्यवस्थांच्या जवानांनी गराडा घातला होता. यावेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहे. मात्र राज्यपालांच्या निर्देशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ११ जुलै या सुनावणीच्या तारखेपर्यंत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाऊ नये, तसा अंतरिम मनाई आदेश द्यावा, अशी विनंती शिवसेनेने सुप्रीम कोर्टाला केली होती. तेव्हा तसे काही घडल्यास तुम्ही केव्हाही सुप्रीम कोर्टात येऊ शकता, त्यासाठी आम्ही आदेश देण्याची आवश्यकता नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे.
…..

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने