महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ चर्चेत

ब्युरो टीम : महाराष्ट्रातील सत्तानाट्यातील धक्कातंत्रामधून अनेकजण सावरले नसतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदींची हीच महाराष्ट्राच्या राजकारणात रणनीती असल्याची चर्चा आता रंगली आहे.
देशपांडे यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ‘बुद्धिबळता प्रत्येक मोहऱ्याची आपली एक अशी स्वतंत्र ताकद असते, अद्वितीय क्षमता असते. तुम्ही एका प्यादाला घेऊन योग्य चाल खेळली, त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केलात तर तो मोहरा सर्वशक्तिशाली होतो. बुद्धिबळात ज्या प्यादाला सर्वात दुबळं मानलं जातं, तो मोहराही ताकदवान होऊ शकतो. फक्त सतर्कता आणि योग्य चाल खेळण्याची गरज असते. हे जमलं तर पटावरील साध्या प्यादालाही हत्ती, उंट आणि वजीराइतकी ताकद प्राप्त होते,’असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून नरेंद्र मोदी यांनी अशीच एखादी चाल खेळली आहे का, याची प्रचंड चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देत त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना आपल्याकडे खेचून शिवसेनेला नामोहरम करण्यासाठीच भाजपने जोरदार खेळी खेळल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर हिंदुत्वाच्या मुद्यासाठी शिवसेनेसोबत युतीचा आग्रह धरला होता हे एकीकडे दाखविताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना जे करता आले नाही ते आम्ही करून दाखविल्याचा संदेशही यातून भाजपने दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने