ब्युरो टीम :राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजूनही प्रचंड आशावादी आहे. शिंदे यांचे बंड शमेल, असे काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते आणि पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या जवळपास निम्म्या आमदारांची ताकद असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच सुळे यांनी शिंदे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. शिंदे यांच्या बंडाविषयी सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी विधानभवनाच्या लायब्ररीमध्ये आले होते. मला या सगळ्याविषयी काहीही माहिती नाही. नक्की काय चाललंय हेच माहिती नाही. पण संध्याकाळपर्यंत सगळं क्लीअर होईल. तेव्हा बघू या, अशी मोघम प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आल्याची हवा केली जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका असल्याचे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा