ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहूत कार्यक्रम पार पडला. देहूत संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. मात्र, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवण्यात आलं. या कार्यक्रमात अजित दादांचं भाषणच झालं नाही. त्यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.
"मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉलसाठी अजित पवारांचं भाषण व्हावं म्हणून महाराष्ट्र सरकारने पीएमओला विनंती केली होती. पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाही. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे. आमच्या राज्यातील आमचा नेता व्यासपीठावर आहे. तुम्ही विरोधीपक्षाच्या नेत्यांना भाषण करु देता, पण आमच्या नेत्याला भाषण करु देत नाही. ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. दुर्दैव आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती", असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, अमरावती येथे सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. एकच वादा अजित दादा, महाराष्ट्राचा आवाज दाबणाऱ्या या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा