भाजपच्या गोट्यात जाणार नवी सेना ? एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ समोर
ब्युरो टीम : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे आमदार हे भाजपच्या गोट्यात जाणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी माघारी यावं, तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचार करु, असं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी ट्विटवरुन देखील आवाहन केलं होतं. त्यातच आता एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आल्यानं राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी परतीचे दोर कापले असल्याचे या व्हिडिओमधून दिसतेय. या व्हिडिओमध्ये सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे हे आपले गटनेते असल्याचे मान्य केल्याचे दिसत आहे. त्यानंतर शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले आहे. ते म्हणाले, भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे.'
टिप्पणी पोस्ट करा