शक्तीशाली 'शिंदे'शाही पुढे शिवसेनेचा खेळ खल्लास ? घडलयचं तसं


ब्युरो टीम : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. शिंदेशाहीच्या शक्तीप्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हतबल आहेत. अशातच सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच विभागांतून आमदार फोडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ भाईंचे विश्वासू रविंद्र फाटक यांनी चर्चा केल्यानंतर शिंदे यांचं समाधान झालं नाही. उलट विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या बाईटमधून एकनाथ शिंदे हे माझ्याजवळ ४० आमदारांचं पाठबळ आहे, असं सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या असून केव्हाही सत्तेवरुन पायाउतार व्हावे लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३२ ते ३३ आमदार आहेत. शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करुन मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचं म्हटलं आहे. आता आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने