पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी औरंगाबादमधील वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेनेचे चेतन कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त एका माध्यमात जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये भाजपविरुद्ध अत्यंत आक्रमक भाषा वापरण्यात आली आहे.
या जाहिरातीचा मथळाच अत्यंत जहाल आहे. 'ज्यादा द्याल 'ताण', तर उलटा घुसेल बाण' असा हा मथळा आहे. उद्धवजी ठाकरेंना घेराल तर गाठ शिवशक्ती... भीमशक्तीशी आहे. आता एकच नारा- शेंडी,जानव्याला हद्दपार करू. ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू, अशा तिखट शब्दांत भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर फार बोलणे टाळले. चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली आहे. मला त्याविषयी फार माहिती नाही. मी स्थानिक नेत्यांकडून याबाबतची माहिती मागितली आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुरु असलेल्या टीकेलाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
टिप्पणी पोस्ट करा