ब्युरो टीम : राज्यसभा निवडणुकीत भाजपसाठी काहीसा अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणत भाजपने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली असून सर्वकाही अलबेल नसल्याची राज्यकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्या जखमेवर अक्षरश: मीठ चोळले आहे. शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, हे देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून जोर देऊन सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर विधानभवनाबाहेर उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रातील जनतेने २०१९ साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
टिप्पणी पोस्ट करा