ब्युरो टीम : आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसंच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.
एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे आसाम चर्चेत असताना दुसरीकडे राज्याला पुराचा फटका बसला असल्याने मोठं संकट निर्माण झालं आहे. आसाममधील २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे बंडाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आसामच्या पुराचाही उल्लेख होत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन आपण सर्वांनी ऐकलं असेलच. माझं अजूनही एवढंच मत आहे की, जे कुणी तिकडे गुवाहाटीत आहेत. माझी हीच अपेक्षा असेल ते खरोखर शिवसैनिक असतील तर त्यांनी गुवाहाटीत आजुबाजूला पूर आलेल्या स्थळी जावं आणि लोकांची सेवा करावी. एकीकडे आसाममध्ये पूर आला असताना, कोण एवढं मजा करायला लावतंय, मला माहीत नाही.’ त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मदत करीत त्याबाबत माहितीही ट्विटवर दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा