लाल किल्ल्यावर पाकिस्तानच्या झेंड्यासारखा झेंडा फडकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या युवकाला अटक

नगर : दिल्लीतील लाल किल्ल्यावर  हिरव्या रंगाचा झेंडा व त्यावर पाकिस्तानाच्या झेंड्याप्रमाणे अर्धचंद्र व चांदणी असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या युवकाला नगरच्या कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अदनान आयाज सय्यद (वय २१ रा. कोतवाली पोलिस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे त्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपी सय्यद याच्याविरूद्ध धार्मिक तेढ निर्माण करणे, राष्ट्रीय प्रतिके आणि स्मारकाचा अवमान करणे यासंबंधीची कलमे लावली आहेत. या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय २८ रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
भंडारी  यांनी सोशल मिडियात हा आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी गुन्हा दाखल करून तातडीने त्या युवकाचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. १० जूनच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सय्यद याने हा व्हिडिओ पोस्ट केल्याचे दिसून आले. फिर्यादीत म्हटले आहे की, 'सय्यद याने इंस्टाग्रामवर द्वेष व दृष्टाव्याच्या भावना वाढविण्याच्या उददेशाने तसेच दोन गटात शत्रुत्व निर्माण होईल या उद्देशाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लाल किल्ला या राष्ट्रीय स्मारकावर भारताचा राष्ट्रध्वजाच्या जागी हिरव्या रंगाचा ध्वज फडकविताना व्हिडिओतून दाखविले आहे. त्यावर एक घंटो का काम हो जायगा, असा मजकूरही लिहिला आहे.' याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल  केला असून पुढील  तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने