ब्युरो टीम : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपविरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपविरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रपतीपदासाठी कोणता उमेदवार देतात, हेदेखील पाहावे लागेल.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर २१ जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भाजप विरोधी असणाऱ्या विविध पक्षांचा राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसने देखील पवार यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल, तर याचा मला आनंदच होईल. शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे ट्विट नाना पटोले यांनी केले होते.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे. १५ जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा