ब्युरो टीम : गुवाहाटीहून निघण्यापूर्वी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे हे सर्व आमदार कामाख्या देवीच्या मंदिरात दाखल झाले होते. आता देवीचा आशीर्वाद घेऊन हे सर्व बंडखोर पुढच्या मोहीमेसाठी रवाना होतील. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्राध्यापक हरी नरके यांची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘घटना सभेत १७/१०/१९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रास्ताविका /सरनामा मंजुरीसाठी सादर केला. " आम्ही भारताचे लोक " ही बाबासाहेबांनी केलेली सुरुवात काही सनातनी सदस्यांना आवडली नाही. त्यांनी "देवाच्या नावाने " अशी दुरुस्ती सुचवली. त्यावर आसामचे सदस्य रोहिणीकुमार चौधरी यांनी आपण कामाख्या देवीचे भक्त असून सरनाम्याची सुरुवात " देवीच्या नावाने " करावी अशी दुरुस्ती मांडली. त्यावर भरपूर चर्चा झाली. शेवटी विषय मतदानाला टाकण्यात आला. लोकशाहीमध्ये लोक हेच सर्वोच्च आणि सार्वभौम असतात यावर डॉ. आंबेडकर ठाम राहिले. सभागृहात २९२ सदस्य हजर असूनही त्यातल्या ६३ टक्के सदस्यांनी देव, देवी की लोक या वादात न पडता तटस्थ भूमिका घेतली. ३७ टक्के सदस्यांनी मतदान केले. झालेल्या मतदानातील ३८ टक्के मते देव, देवीला तर ६२ टक्के मते लोकांना पडली.इतिहास सांगतो, कामाख्या देवी काही पावली नाही. पण तेव्हा ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग, राज्यपाल, तसेच इतर सगळ्या केंद्रीय यंत्रणा नाना पेशव्यांच्या कबज्यात नव्हत्या. देशाचे नेतृत्व नेहरू करीत होते. आज आसाम बापूंच्यामागे दिलासालय ते केंद्र सरकार सारे काही आहे. लढाई फक्त सत्य आणि न्यायाची नसून अतिशय विषम आहे. बघू यावेळी कोणाची सरशी होते ते. नाना पेशवे तथा कामाख्यादेवी की संविधान? कोण जिंकते ते दिसेलच, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा