नगर : २०१९ पासून पुढे मनपाने कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदार संस्थेने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कचरा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा घोटाळा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. या कचरा घोटाळ्याची चौकशी व्हावी, आणि संबंधितावर गुन्हे दाखल व्हावे, अशा मागणीची याचिका शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी केली होती . त्यावर संबंधित ठेकेदार संस्था स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चालकाविरुद्ध भा. द. वि . कलम १५६/३ प्रमाणे ४२०, ४६७ व ४६८ तसेच इतर कलमान्वये फसवणुक तसेच आर्थिक अपहाराचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान न्यायाधीश श्री सुधाकर येरलागड्डा यांनी हे आदेश दिले आहेत.
कोरोना काळात नगर शहरात कडक लॉकडाऊन असताना दररोज १७५ ते २०० टन कचरा संकलनाची खोटी बिले सादर करून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ठेकेदार संस्थेला आता पोलीस चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीची पालिकेत सत्ता असतानाच्या काळात हा घोटाळा झाला होता. त्याचा पाठपुरावा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी माहितीच्या अधिकारात केला होता. त्यात त्यांना अनियमितता आढळल्याने त्यांनी रीतसर सरकार आणि पालिकेकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
कर रूपाने नगर शहरातील नागरिक प्रामाणिकपणे आपल्या कष्टाच्या कमाईतून भरत असतांना हे पैसे आर्थिक अपहार करून ठेकेदार पालिका अधिकारी आणि पदाधिकारी यांना हाताशी धरून हडप करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता . त्याबाबतचे तांत्रिक पुरावे आणि ठेकेदाराने सादर केलेली खोटी बिले तसेच अधिकाऱ्यांनी अदा केलेल्या बिलांचे तपशील जाधव यांनी न्यायालयात सादर केले होते. त्यावर सुनावणी होऊन जाधव यांच्या याचिकेतील तथ्य गृहीत धरून गुन्हा दाखल करून पोलीस तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा