ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा दिवस होऊन गेले आहेत. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, अद्यापही राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि बंडखोर शिवसेना आमदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. त्यातच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
‘एकनाथ शिंदेंकडे १४४ चं बहुमत नाहीय. मी ऐकलंय त्याप्रमाणे त्यांच्याकडे ५० आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असं म्हणता येणार नाही,’ असं सुप्रिया सुळेंनी काल, मंगळवारी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने सुप्रिया यांचं हेच विधान ट्विटरवरुन शेअर केल्यानंतर ते ट्विट कोट करुन त्यावरुन निलेश राणेंनी सुप्रिया यांना लक्ष्य केलं आहे.
‘हे बघून हसावं की रडावं समजत नाही. काही किती हुशार खासदार आपल्या देशाला मिळाले आहेत, राष्ट्रवादी पक्ष ५४ (जागा) घेऊन सत्तेत आहे आणि ५६ (जागा असणाऱ्या शिवसेने)चा मुख्यमंत्री आहे,’ असं ट्विट नितेश राणेंनी सुप्रिया यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केलंय.
टिप्पणी पोस्ट करा