अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही : संजय राऊत


ब्युरो टीम : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. काल, गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली होती. त्यावरूनच आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. 
राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ‘महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,’ असं राऊतांनी म्हटलं आहे. तसंच, राऊतांनी पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण 

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न आपण करू, असं म्हटलं होतं. तसंच, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असं म्हटलं होतं. शरद पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. माननीय शरद पवार साहेब गुवाहाटीतील आमदारांना धमक्या देत आहेत. ‘सभागृहात येऊन दाखवा,’ असे सांगितले जात आहे. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं राणेंनी म्हटलं होतं. राणेंच्या या ट्वीटनंतर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने