नव्या सरकारचा ठाकरे यांच्या विरोधात पहिल्याच दिवशी निर्णय

ब्युरो टीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला आहे. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे व फडणवीस या जोडीने ठाकरे सरकारला विविध धक्के देण्यास एकप्रकारे सुरुवातच केली आहे. 
राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.  ठाकरे यांनी आरेमधील तर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, राज्यात सत्तांतर होताच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने