ब्युरो टीम : ‘मला कोणाशीही वाद नकोय. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्याच्या नोटीस आल्या आहेत. कदाचित उद्याच्या दिवशी चीनच्या सीमेवरील सैनिकही मुंबईत बंदोबस्तसाठी आणले जातील. पण मला शिवसैनिकांचे रक्त सांडायचे नाही. त्यामुळे उद्या शिवसैनिकांनी कोणाच्याही मध्ये येऊ नये. उद्या नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. उद्याचा विश्वासदर्शक ठराव किती आमदार आहेत, लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही,’ असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आपण विधानपरिषद सदस्यत्त्वाचाही त्याग करत असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करत शिवसेनेतील ३९ आमदार फोडले होते. हे सर्व आमदार गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीत वास्तव्याला होते. मात्र, राज्यपालांनी गुरुवारी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर हे सर्व बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार आहेत. यावेळी शिवसैनिक आणि या आमदारांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना महत्त्वाचे आदेश दिले.
टिप्पणी पोस्ट करा