ब्युरो टीम : 'माझ्या समोर या आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला नकोत. तुम्ही या पदासाठी लायक नाही, असं सांगा. मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, ' अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करीत बंडखोर आमदारांना परत येण्याचे आव्हान केले आहे. मला खुर्चीचा, पदाचा मोह नाही. मी आज संध्याकाळीच वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाईन, असेही ते म्हणाले.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही, अशी टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या निधनानंतरचा घटनाक्रमच सांगितला. बाळासाहेबांचं निधन २०१२ मध्ये झालं. त्यानंतर आपण २०१४ मध्ये एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ६३ जागा निवडून आणल्या, असेही त्यांनी सांगितलं. आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. सेनेला हिंदुत्वापासून दूर करताच येणार नाही. आपण आजही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. २०१२ नंतर म्हणजेच साहेबांच्याा निधनानंतर तुम्हाला जे काही मिळालं, पदं उपभोगलीत, ती साहेबांनंतरच्या सेनेनंच दिलीत याचा विसर पडू देऊ नका.मुख्यमंत्री तुम्हालाच व्हावं लागेल. तरच हे सरकार नीट चालेल, असं शरद पवारांनी मला अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन होण्याआधी सांगितलं. मी त्यावेळी नकार दिला. मात्र पवारांनी विश्वास दाखवला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विश्वास दाखवला. आजही ते पाठिशी ठामपणे उभ आहेत. पण माझ्याच माणसांना मी नको असेन तर काय बोलणार? त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. फक्त त्या आमदारांनी मला प्रत्यक्ष येऊन ही गोष्ट सांगावी की तुम्ही आम्हाला या पदावर नकोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी चेंडू बंडखोरांच्या कोर्टात टाकला.
टिप्पणी पोस्ट करा