श्रीलंका, पाकिस्तान नंतर आता नंबर ब्रिटनचा?
विदेश वृत्त : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यासाठी आता सत्ताधारी पक्षाच्या ४० खासदारांनी आघाडी उघडलीय. ब्रिटनमधील या राजकीय घडामोडींमुळं बोरिस जॉन्सन यांचं पंतप्रधानपद टिकून राहणार का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करत डाऊनिंग स्ट्रीटमधील कॅबिनेट रुममध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं बोरिस जॉन्सन, त्यांची पत्नी आणि इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. जॉन्सन यांनी पहिल्यांदा सरकारी सूचनांचं पालन केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणी दंडाची रक्कम भरून माफी देखील मागितली होती. तरी देखील विरोधकांसह सत्ताधारी खासदार आक्रमक झाल्यानं जॉन्सन यांचं पंतप्रधानपद संकटात आलं आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीय.
वेकफिल्डमध्ये २३ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी एक मतदानपूर्व सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. पार्टीगेट प्रकरणामुळं जॉन्सन यांच्या पक्षाचा उमेदवार तब्बल २० टक्के मतांच्या फरकानं पराभूत होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोटनिवडणुकीत मजूर पक्षाला समर्थन मिळण्याची शक्यता असून त्याप्रमाणं निकाल जाहीर झाल्यास बोरिस जॉन्सन यांच्यापुढील अडचणी वाढू शकतात.
म्हणून वाढली अडचण
करोना संसर्ग असताना लॉकडाऊनमध्ये १९ जून २०२० रोजी बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवसानिमित्त डाऊनिंग स्ट्रीटमध्ये कॅरी जॉन्सन यांच्याकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ३० लोक सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. लॉकडाऊन असताना दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना ही पार्टी झाल्यानं या संपूर्ण प्रकरणाला पार्टीगेट नाव देण्यात आलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा