मुख्यमंत्री शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, गुलाबाराव पाटलांचा टोला


ब्युरो टीम : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत,’ असे वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे वेध लागले आहेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला पोहोचतील. त्यापूर्वी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने