ब्युरो टीम : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका सादर करण्यात आली आहे. मात्र, आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी यावरून शिवसेनेवरच तोफ डागली आहे. असल्या धमक्यांना भीक घालत नाही, कायदाही आम्हीही जाणतो, असे ट्विट करीत शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून विविध नाट्यमय घडामोडी घडत आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच आता शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका सादर करण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. आता शिवसेनेच्या या खेळीला एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत उत्तर दिले आहे.
शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.’
दरम्यान, शिवसेना आता यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा