शिवसेनेने भूमिकेबाबत यू-टर्न घेताच, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...



ब्युरो टीम : ‘मुख्यमंत्री २४ तासांत त्यांच्या भूमिकेबाबत असा यू-टर्न घेतील का, याबाबत मला साशंकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुकवरील कालच्या भाषणात ते असं काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मला याबाबत आश्चर्य वाटत आहे,’ असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

शिवसेनेतील बंडखोर आमदार २४ तासांमध्ये मुंबईत आल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘मला समजत नाही की, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का? गुवाहाटीत शिवसेनेचे ४५ आमदार जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहेत का? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत यायला तयार आहेत का? शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराच चव्हाण यांनी केली. कालच्या भाषणात उद्धवजी असे काही बोलले नाहीत. ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान,  आता शिवसेना मात्र महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने