ब्युरो टीम : शिवसेनेमध्ये ठाकरे यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा. ठाकरे यांचा आदेशावरच शिवसेना चालत होती. मात्र, आता एकनाथ शिंदे गट हा अशी काही खेळी करीत आहे की, त्यामुळे एकनाथ शिंदे हेच ठाकरे यांना आदेश देत तर नाही ना, अशी चर्चा सुरु झालीय.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि १० अपक्ष आमदार आहेत. गोव्यात आज सकाळी शिंदे गटाची बैठक झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. यावेळी आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिले. या बैठकीत आक्रमक भूमिका या गटाने घेतली आहे. या गटाने व्हिप काढला असून शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये बोलावल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मात्र, असा व्हिप काढल्यास आदित्य ठाकरे यांनाच एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे, असा अर्थ निघेल.
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माघार घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून यापूर्वीच संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेत उरलेल्या १६ आमदारांना व्हिप बजावला जाण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार सध्या गोव्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांनाही व्हिप बजावून गोव्यात आणण्याची रणनीती एकनाथ शिंदे गटाने आखल्याचे समजते. या व्हिपवरून आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात पुन्हा एकदा कायदेशीर संघर्ष होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा