ब्युरो टीम : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत ‘एमआयएम’ची दोन मते कोणाला जाणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष होते. त्यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा, यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,’ असंही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलयं.
राज्यसभा निवडणुकीसाठी हे आहेत उमेदवार
प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)
कोणत्या पक्षाचे किती आमदार ?
१०६ भाजप
५५ शिवसेना
५३ राष्ट्रवादी
४४ काँग्रेस
अपक्ष व छोटे पक्ष २९
टिप्पणी पोस्ट करा