विरोधकांना धक्का; मायावतींचा NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा


ब्युरो टीम : सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केलीय.
आमचा हा निर्णय भाजप किंवा एनडीएच्या समर्थनार्थ अथवा विरोधकांच्या विरोधात नसून पक्षाच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं. विरोधकांनी उमेदवार जाहीर करण्याबाबत आमचा सल्ला घेतला नाही, असंही मायावती म्हणाल्या. द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. भाजप नेत्यांशिवाय वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी, ओडिशातील बिजू जनता दल सरकारचे दोन मंत्री, संबित पात्रा, एआयएडीएमके नेते ओ. पनीरसेल्वम, थंबी दुराई आणि जनता दलचे राजीव रंजन सिंग हेही उपस्थित होते
उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी वादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया, ममता आणि पवार यांच्याकडून कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाहीय. परंतु, त्यांनी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) 27 जून रोजी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने