मिझोरामच्या 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात 67 किलो गटात सुवर्णपदक पटकावत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. जेरेमीने एकूण 300 किलोग्रॅम (स्नॅचमध्ये 140 किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलोग्रॅम) वजन उचलले, जो राष्ट्रकुल खेळातील विक्रम आहे. स्पर्धेतील भारताचे हे एकूण पाचवे पदक आणि दुसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी या कामगिरीबद्दल जेरेमीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
याआधी, मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत एकूण 201 किलोग्रॅम वजन उचलून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले. बिंद्याराणी देवीने महिलांच्या 55किलो भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकले आणि गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेमी लालरिनुंगा यांचे त्यांच्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा