केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी बैठक संपन्न

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी बैठक, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान येथे पार पडली.हिम बिबट्याविषयी राष्ट्रीय स्टड बुक आणि प्राणी संग्रहालयांचा विकास,संशोधन कार्यक्रम याबाबत अद्ययावत माहिती देणारे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण त्रैमासिक वृत्तपत्र या दोन पुस्तिकांचे बैठकीदरम्यान प्रकाशन करण्यात आले.
           यावेळी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाद्वारे 2021-22 या आर्थिक वर्षात केलेल्या उपक्रमांची सदस्यांना माहिती देण्यात आली. बैठकीदरम्यान, तांत्रिक समिती आणि प्रशासकीय समितीच्या शिफारशींचा आढावा घेऊन ते मंजूर करण्यात आले. इतर चर्चांमध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल (2021-22) आणि भारतीय प्राणीसंग्रहालयांमधील प्राण्यांचा ताबा आणि हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावांचा समावेश होता.
           भारतीय प्राणीसंग्रहालयासाठी राजदूत म्हणून कार्य करू शकणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावांवर विचार करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. प्राणिसंग्रहालयांनी हाती घेतलेल्या संवर्धन उपक्रमांना पाठिंबा मिळावा आणि या क्षेत्रातील बहु-क्षेत्रीय,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही चर्चा करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (http://cza.nic.in/) ही एक वैधानिक संस्था आहे. भारतीय प्राणीसंग्रहालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी आणि अद्ययावत उपायांद्वारे वन्यजीव संरक्षण धोरणांना पूरक म्हणून 1992 मध्ये भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 मध्ये सुधारणा करून त्याची स्थापना करण्यात आली.
           केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे मार्गदर्शक उद्दिष्ट भारतीय प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांच्या निवास, संगोपन आणि आरोग्यसेवेसाठी सर्वोत्तम पद्धती सुनिश्चित करणे हे आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाअंतर्गत 147 प्राणीसंग्रहालये येतात. प्राणीसंग्रहालये संवर्धन जागरुकता, दुर्मिळ प्रजातींचे प्रदर्शन, बचाव आणि पुनर्वसन आणि धोक्यात आलेल्या प्रजातींसाठी संवर्धन प्रजनन कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम राबवतात. सुमारे 8 कोटी लोक वर्षाकाठी या प्राणी संग्रहालयांना भेट देतात. प्राणीसंग्रहालये ही वन्यजीव संरक्षण आणि जागरूकता यासाठी शिक्षण केंद्रे म्हणून काम करतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने