माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

ब्युरो टीम : सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावरून राज्य सरकारला आवाहन केलं आहे. “माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल, असे ठाकरे म्हणाले. 
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे.
आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. “आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने