हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार : मुख्यमंत्री शिंदे


ब्युरो टीम : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे.आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे.  राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरीय लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा हे अभियान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने