हे सरकार टिकणारच, फडणवीस थेट बोलले

 



ब्युरो टीम : 'काही जण म्हणतात हे सरकार ६ महिने चालेल. २०१४ मध्येही भाजप सत्तेत आलं, तेव्हा काही जण म्हणाले होते की हे सरकार ५ वर्ष टिकणार नाही, पण चाळीस वर्षांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण सरकार आलं आणि ते चालवणारा हा देवेंद्र फडणवीस होता. पुढची अडीच वर्ष तर आम्ही पूर्ण करुच, पण त्यानंतरची पाच वर्षही पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला देशात एक नंबरचं राज्य केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची जोडी स्वस्थ बसणार नाही,' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर एकप्रकारे निशाणा साधला. 
उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आपले होमपीच नागपुरात आले. यावेळी फडणवीस दाम्पत्याची भव्य रॅली काढण्यात आली. जनतेशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी मागील सरकारवर टीकेची झोड उठवली. फडणवीस  म्हणाले, ' 'सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी गेलो, तर आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अनाऊन्स करुन टाकलं की देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये जावं. जेपी नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे माझ्याशी बोलले. आपल्या पक्षात आदेश हाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी एकच निर्णय केला, की नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्या पाठीशी नसते तर आपला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. जे नेते आणि पक्ष आपल्याला सर्वोच्च पदावर नेतात, त्यांनी आदेश दिला, तर मी घरी बसायलाही तयार आहे, पण त्यांनी तर माझा सन्मान केला आहे. मोदी-शाह म्हणाले की १०६ जणांचं नेतृत्व तू करतोयस, जबाबदारी घे आणि सरकारमध्ये जा,' असं फडणवीसांनी रॅलीत जनतेशी संवाद साधताना सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने