ब्युरो टीम: ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा हा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिली. नीरज चोप्राने आम्हाला त्याच्या दुखापतीबाबत माहिती देत तो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकत नसल्याचे सांगितले.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेत 88.13 मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राकडून येत्या 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाचा दावेदार होता. मात्र जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेत त्याला अंतिम फेरीवेळी दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिली.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. मात्र त्याने स्पर्धा पूर्ण करता यावी यासाठी मांडीला बँडेज बांधून भाला फेकला होता. अशा परिस्थितीही नीरजने 88.13 मीटर भाला फेक करत रौप्य पदकाची कमाई केली. पदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या दुखापतीबाबत सांगितले. याचवेळी तो ही दुखापत कितपत गंभीर आहे हे उद्या सकाळपर्यंत कळेल म्हणाला होता. आता राष्ट्रकुल स्पर्धेतून नीरजने माघार घेत्यानंतर त्याची दुखापत गंंभीर स्वरूपाची असल्याचे सिद्ध झाले.
नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात 90 मीटर मार्क पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याने याच वर्षी स्टोकहोम डायमंड लीग 2022 मध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने 89.94 मीटर भाला फेकला होता. त्यामुळे या हंगामात तो 90 मीटर मार्क पार करणार अशी आशा होती. मात्र दुखापतीमुळे नीरज चोप्रा बॅकफूटवर गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा