पर्यावरणासाठी वृक्षलागवडीसह संगोपन आवश्यक : जिल्हाधिकारी आंचल गोयल



ब्युरो टीम:
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिंतूर- परभणी मार्गावर दुतर्फा सोमवारी (ता.२५) वृक्षलागवड मोहिमेला सुरवात करण्यात आली. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन, संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
महसूल, शिक्षण विभाग व पर्यावरणप्रेमी यांच्या समन्वयातून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर झालेला कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय अधिकारी श्रीमती दाभाडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, पोलिस निरीक्षक दीपक दंतूलवार, गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीमती गोयल यांनी विभागीय आयुक्तांनी परभणी जिल्ह्यासाठी सुमारे एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या माध्यमातून ४० ते ५० लाख वृक्ष लागवडीचे नियोजन महसूल मंडळ, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, यासाठी पर्यावरणप्रेमींचा तसेच वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी लोकसहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, सिद्धेश्वर विद्यालयाच्या मुला-मुलींनी वृक्षदिंडी काढून परभणी मार्गावर दुतर्फा वृक्षलागवड केली. ज्ञानोपासक महाविद्यालयाने ‘रासयो’तर्फेही मोहिमेत सहभाग नोंदविला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने