ब्युरो टीम: 68 व्या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच काही दिवसांआधी घोषणा करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीवनं प्रमुख भूमिका साकारलेली. या चित्रपटाला पुरस्कार जाहीर होताच संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. विशेषतः सायलीवर अनेकांनी कौतुकाची थाप टाकलेली पहायला मिळाली. यानंतर तिच्या प्रतिक्रियेसाठी अनेकजण उत्सुक असलेले पहायला मिळाले. यावेळी प्रतिक्रिया देताना सायली भावूक झालेली पहायला मिळाली.
'गोष्ट एका पैठणीची' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्लॅनेट मराठीनं सायली संजीवची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये बोलताना सायली भावूक झालेली पहायला मिळाली. 'या क्षणी बाबा हवे होते', असं सायलीनं म्हटलं होतं. मला बाबांची फार आठवण येतेय. कारण त्यांची फार इच्छा होती की एखादा मोठा आणि मानाचा पुरस्कार मला मिळावा, असं सायलीनं मुलाखतीत म्हटलं. अशातच राष्ट्रीय पुरस्कार मिळून पाच दिवस झाल्यानंतर सायलीनं तिच्या बाबांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.
बाबांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सायलीनं 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव', असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक भावनिक प्रतिक्रिया येताना दिसतायेत. 'आठवणी मनात दाटून राहतात, आपले आदर्श डोळ्यासमोर समोर येतात, तुझ्यासोबत ते कायमच आहेत आणि त्यांचे आशिर्वादही', अशा अनेक कमेंट सायलीच्या पोस्टवर येताना दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं बाबांसोबतचा फोटो शेअर केलेला पहायला मिळाला.
दरम्यान, 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी इत्यादी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे यांनी या चित्रपटाची निर्मीती केलेली पहायला मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा