मुंबईच्या चैतन्याचा जगभर डंका ; शॉर्टफिल्मने जिंकले ७० हुन अधिक पुरस्कार

 


ब्युरो टीम : स्वतःच्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करून दुसऱ्याला मदत करूनसुद्धा आनंद मिळवता येतो, हा महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या 'द बलून' या मराठी लघुपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आतापर्यंत या लघुपटानं भारतातील विविध लघुपट महोत्सवांमध्ये ७०हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. तर इंग्लंड, ब्राझील, ग्रीस, रशिया, बांग्लादेश, इटली आणि टर्की अशा ७ देशातील चित्रपट महोत्सवांसाठी या लघुपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे. त्याचबरोबर अलीकडेच इटली येथे झालेल्या 'प्रिमावेरा दी ओरीयेंते अवॉर्ड' सोहळ्यात प्रेक्षकपसंतीचा पुरस्कारही या लघुपटानं पटकावलाय.

        गोरेगाव येथे राहणाऱ्या चैतन्य आपटे या २५ वर्षीय तरुणानं या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संहिता, संवाद, संकलन, ध्वनीमिश्रण आणि सिनेमॅटोग्राफीची जबाबदारीसुद्धा त्यानंच सांभाळली आहे. तर सहायक डिओपीचं काम क्षितिज भंडारीनं केलंय. 'मी चित्रपटनिर्मितीचं शिक्षण घेतलेलं नाही. पण या गोष्टीला मी माझ्या स्वप्नांच्या आड येऊ दिलं नाही आणि उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून व्यवस्थितपणे लघुपट साकारला', असं चैतन्य सांगतो. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख चित्रपटकार, सर्वोत्कृष्ट आगामी दिग्दर्शक असे पुरस्कारही त्याला मिळाले आहेत.

       


'द बलून' या लघुपटातून चिंटू या लहान मुलाची हृदयस्पर्शी कथा मांडली आहे. एके दिवशी चिंटूला फुगा घेण्याची इच्छा निर्माण होते, पण पैशांअभावी तो घेऊ शकत नाही. बांधकामस्थळी काम करणाऱ्या चिंटूच्या आईनं त्याला 'गरीब असलो तरी भिक मागायची नाही, मेहनत करायची' अशी शिकवण दिलेली असते. हेच जाणून फुगा घेण्यासाठी पैसे मिळवायला चिंटू कसे प्रयत्न करतो आणि नंतर एका घटनेनं आयुष्यातला सर्वात मोठा धडा कसा शिकतो, याचं चित्रण 'द बलून' या लघुपटातून करण्यात आलंय. अंतरिक्ष श्रीवास्तव यांची कथा असलेला हा लघुपट 'Six Sigma Films' या युट्यूब चॅनलवर पाहता येईल. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने